दारूच्या मोहापायी चोरीच्या ठिकाणीच केले मद्यप्राशन

धाड : पोलिसनामा ऑनलाईन – बुलडाणा-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बियरबारमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख ३९ हजार रुपये किमतीची दारू चोरी केल्याची घटना ११ डिसेंबरला उघडकीस आली. विशेष म्हणजे विदेशी दारू बॅगमध्ये भरल्यानंतर दारू पिण्याचा मोह न आवरल्याने तेथेच चोरट्याने मद्यप्राशन केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञतांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर राजेश आसाराम मालवे यांचा बियरबार आहे. १० डिसेंबरला येथील कामकाज आटोपल्यानंतर बार बंद केला होता. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बियरबारची सिमेंट व लाकडी दरवाजाच्या कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. सोबतच हॉटेलच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या नामांकित कंपनीची विदेशी दारू बॅगमध्ये भरली. त्यानंतर आपला मोर्चा गोदामाकडे वळवून दोन्ही ठिकाणांवरून तब्बल १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. चोरीदरम्यान बियरबारमध्येच एका चोरट्याने पेग मारला. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने त्यात हे उघड झाले. राजेश मालवे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.

दरम्यान, चोरीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यातच एका चोरट्याचा चेहराही कॅमेऱ्याने स्पष्ट टिपला आहे. त्यामुळे गुन्ह्याची लवकरच उकल होईल, असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.