२ दिवस बँकेलाही नाही पत्ता ; शक्कल लढवून एटीएम मशीन मधील ७ लाख चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरक्षा रक्षक नसलेली एटीएम सेंटर ही आता चोरट्यांचे सहज लक्ष्य ठरु लागली आहेत. चोरट्यांनी सांगवी येथील एका एटीएम मशीन मधील संपूर्ण कॅश बॉक्स चोरुन नेली. पण दोन दिवस याचा बँकेलाही पत्ता लागला नाही. चोरट्यांनी एटीएममधील कॅश बॉक्स गॅस कटरने कापून त्यातील ६ लाख ७५ हजार ७०० रुपये चोरुन नेले.

याप्रकरणी जगदीश सुरेश गणेशकर (वय ३३, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बँक ऑफ इंडियाचे पिंपळे गुरव येथील ओम मेडिकल शेजारी एक एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमध्ये १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते २० फेब्रुवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पिंपळे गुरव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएमचे शटर बंद असल्याने कोणी तिकडे दोन दिवस गेले नाही. २० फेब्रुवारी रोजी जेव्हा एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्यासाठी गाडी आली. तेव्हा त्यांनी शटर उघडून आत प्रवेश केला. पैसे भरण्यासाठी मागील बाजू उघडली तर आतमध्ये कॅश बॉक्सच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी एटीएम सेंटरच्या कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीनची मागील बाजू उघडली. त्यानंतर त्यांनी मशीनची पुढील बाजू बाजूला केली. कॅश बॉक्सचा ट्रे गॅस कटरने कापून त्यातील सर्व रोकड चोरली. त्यानंतर त्यांनी एटीएम मशीन होते तसे लावले. त्यामुळे प्रथमदर्शनी आतमध्ये काय गोडबंगाल झाले आहे, हे बाहेरुन दिसून येत नव्हते.
चोरट्यांनी जाताना एटीएम सेंटरचे शटर खाली केले. त्यामुळे आतमध्ये चोरीचा काही प्रकार झाला आहे, याची कोणालाच कल्पना आली नाही. लोकांना एटीएम सेंटर बंद असावे असे वाटले.
या चोरीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील अधिक तपास करीत आहेत.