हिप्नोटाईज करून भरदिवसा महिलेच्या सोनसाखळीवर चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे शहरात सोनसाखळी चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील पांझरा नदी पात्राजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेली. ही घटना नदी पात्राजवळ आज (बुधवार) दुपारी घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

आज दुपारी पांझरा नदीच्या किनारी महादेव मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यानिमित्त या ठिकाणी भंडारा आयोजित केला होता. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेला हिप्नोटाईज करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरून नेली. काही वेळाने गळ्यातील पोत नाही असे मुलीने महिलेला सांगितल्यावर चोरट्यांनी सोन्याची पोत चोरून नेल्याचे समजले. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपयांची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली.

यापूर्वी चोरट्यांनी देवपुरा परिसरात धुमस्टाईलने दोन सोनसाखळी चोरून नेल्या होत्या. महिलेने भांभवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.