डेक्कन येथील न्यु पूना बेकरीमधून रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  डेक्कन भागातील प्रसिद्ध न्यु पूना बेकरीत आलेल्या चौघांनी केक घेण्याच्या बहाण्याने चालकास बोलण्यात गुंतवून 2 हजाराची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी बालाजी परदेशी (वय 19) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भांडारकर रस्त्यावर न्यु पूना बेकरी आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चौघेजण दुकानात आले. त्यानी केक घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवत बेकरीच्या बाहेर बोलावले. तसेच त्यांचे लक्ष नसताना एकाने काऊंटरमध्ये ठेवलेले 2 हजार रुपये घेऊन पोबारा केला. यावेळी त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. डेक्कन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिसरातील पाहणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.