लिलाव प्रक्रिया सुरु असलेल्या पॅनकार्ड क्लबमध्ये चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सेबीने ताब्यात घेतलेल्या व लिलाव प्रक्रिया सुरु असलेल्या बाणेर येथील पॅनकार्ड क्लबमध्ये चोरी झाली असून तेथील कॉम्प्युटर, टिव्ही, फर्निचर अशा वस्तू चोरुन नेण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सेबीच्या अधिकाऱ्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी, पॅन कार्ड क्लब बाणेर, हॉटेल युनायटेड २१ व ग्रँड या मालमत्तेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याने केंद्र सरकारने ही मालमत्ता २१ डिसेंबर २०१६ रोजी सेबीला संलग्न केली होती. त्यानंतर या मालमत्तेचा ताबा पॅनकार्ड क्लबकडेच होता. सेबीकडून लिलाव प्रक्रिया चालू होती. या मालमत्तेचे काही नुकसान झाल्याबाबत सेबीचे अधिकारी तांडव कृष्णा चंदलुरी व त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती मिळाली. त्याबाबत त्यांनी पुणे महापालिकेकडे विचारणा केली. महापालिकेने ही जबाबदारी पॅनकार्ड क्लब्सची असल्याचे कळविले. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले.

तांडव, दीपक राऊत, आनंद माने यांनी २८ जानेवारीला बाणेर येथील पॅन कार्ड क्लब हॉटेलचा भेट दिली. तेव्हा त्यांना दिसून आले की येथील गेट तोडलेले होते. तसेच आतमधील साहित्याचे नुकसान तसेच कॉम्प्युटर, टिव्ही, फर्निचर इत्यादी वस्तूची चोरी केल्याचा संशय आला. त्यानुसार सेबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.