पंतप्रधान भारतीय जन औषध केंद्रात लाखोंची चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे तालुक्यातील सोनगीर गावा जवळील मुंबई – आग्रा महामार्गालगत असलेल्या मे. चिरायु गॅस एजन्सी व प्रणव डेरे पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रात गुरुवारी रात्री दोन ते तीन च्या सुमारास धाडसी चोरी झाली. या घटनेत २ लाख १९ हजार ५५५ रुपयांच्या मुद्देमालासह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरट्यांनी जवळच असलेले प्रणाम जी मंदिर मधील दानपेटी फोडून पंचवीस हजार रुपये लंपास केले.

सोनगीर गावाजवळील प्रणव पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्र व गॅस एजन्सी येथे गुरुवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र चोरट्यांचा मार्ग मिळू शकला नाही. तीन ते चार चोरट्यांनी बनियन व बरमुडा वेशात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस उप निरीक्षक आर.डी.पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

चिरायु गॅस एजन्सीचे मालक कृष्णा शंकर डेरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लॅपटॉपसह गॅस शेगड्या, रेगुलेटर, कॉम्प्युटर मॉनीटर औषधाच्या दुकानांमधून टॅबलेट कॅप्सूल चे बॉक्स व रोख रक्कमेसह २ लाख १९ हजार ८५५ रुपये चोरीला गेल्याची तक्रार सोनगीर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. याचवेळी प्रणाम जी मंदिर येथील दानपेटीतील रोख रक्कम पंचवीस हजार रुपये लंपास केली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उप निरीक्षक आर. डी. पाटील करीत आहेत.