पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये चोरी; 6 कक्षाचे कुलूप तोडले

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चाव्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ कार्यालयामध्ये आल्यानंतरही त्यांचा कक्ष बंद होता. तेथील कार्यरत शिपायाने चाव्यांची शोधाशोध केली. ज्या ठिकाणी दररोज चाव्या ठेवल्या जात होत्या, तेथे त्या चाव्या दिसत नव्हत्या. हा प्रकार पाहून पोलीस अधीक्षक वैतागले. त्यांनी तत्काळ या घटनेचा पंचनामा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना पाचारण केलं. चाव्या कुणी चोरल्या याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे आदेश दिले. तेव्हा त्यांना दुसरा धक्का बसला.

यवतमाळ शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. चोरट्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चाव्या लंपास केल्याचा प्रकार घडला असून यामुळे खुद्द पोलीस अधीक्षकांनाच काही काळ कक्षाबाहेर ताटकळत उभे रहावे लागले. ही घटना शनिवारी सकाळी घडली.त्यानंतर याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही बंद
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही मागील तीन दिवसांपासून बंद असल्याचे समजले. कठोर शिस्तीवर विश्वास असणार्‍या पोलीस अधीक्षक आणखी भडकले. अहोरात्र सुरक्षा गार्ड तैनात असतात. तसेच कक्षासमोरही पोलीस शिपाई पूर्णवेळ उपस्थित असतात. अशा कडेकोट सुरक्षेतून चाव्यांची चोरी झालीच कशी? असा प्रश्न पडला होता. अशा प्रकारचे जाणीवपूर्वक आव्हान निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असावे, असे ऐकायला मिळत होते.

चाव्या नसल्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहा कक्षाचे कुलूप तोडण्याची वेळ आली. पोलीस अधीक्षकांचे कक्ष, जिल्हा विशेष शाखा, स्टेनोचे कक्ष, अभ्यागत कक्ष, गृहउपअधीक्षकांच्या कक्षाचे कुलूप तोडले. तत्पूर्वी त्याचा पंचनामा केला.

चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच
यवतमाळ शहरातील विविध भागात चोरीच्या सातत्याने घटना घडत आहेत. त्यातील बहुतांश गुन्हे उघडकीस येत नसल्याचे समजत आहे. जनसामान्यांच्या मालमत्तेवर चोरटे हात साफ करीत आहेत. आता खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाच चोरट्याने टर्गेट केलं आहे. या अगोदर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातून चंदनाची झाडे चोरीला गेली होती. त्यानंतर चोरट्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात हात मारल्याने पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

पोलिस कार्यालयालाच सुरक्षेची गरज
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरामध्ये सर्वसामान्य व्यक्ती पाय ठेवण्याची हिंमत करीत नाही. फाटकावरच त्याची चौकशी केली जाते, हे सर्वांना माहित आहे. अशा स्थितीत चोरट्याने अगदी पोलीस अधीक्षकांच्या कक्षाबाहेर टांगून असलेल्या चाव्यां गुच्छा पळविल्याने सुरक्षेची हमी देणारे कार्यालय असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.