Pune : पुण्यातील ओंकारेश्वर घाटावरील दशक्रिया विधीचं सामान चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात दशक्रिया करण्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओंकारेश्वर घाटावर विधीसाठी आवश्यक असणारे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. एका वर्षातील ही तीसरी घटना आहे. चोरट्यांनी तांबे, पितळ आणि चांदीच्या साहित्याची चोरी केली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत मोघे गुरुजींनी सांगितले की, नेहमी प्रमाणे आम्ही सकाळी ओंकारेश्वर घाटावर आलो. दशक्रिया करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आम्ही ऑफिसमध्ये ठेवतो. सकाळी साहित्य घेण्यासाठी गेलो असता ऑफिसचे शटर उचकटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता सर्व साहित्याची नासधूस केल्याचे दिसलं. चोरट्यांनी पितळ, तांबे आणि चांदीचे साहित्य चोरून नेले.

चोरट्यांनी जवळपास 40 तांबे, 40 ताम्हण, पळी भांड्याचे 20 सेट, पराती-पातले, चांदीचा तांब्या, 3 भांडी, चांदीचे 2 ताम्हण, आणि एक पळी एवढं साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. या सर्व साहित्याची आजच्या घडीला 80 ते 90 हजार रुपये किंमत आहे. अशी घटना यापूर्वी देखील घडली असून एका वर्षातील ही तीसरी घटना आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे, असे प्रशांत मोघे गुरुजींनी सांगितले.