द्रुतगती महामार्गावर लुटमारीचे प्रकार सुरूच

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाकडहून मुंबईला कारमधून जात असताना प्रवासी म्हणून बसलेल्या ग्राहकाला चाकूचा धाक दाखवून एक लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

या प्रकरणी मुकेश मोहिंदर कपूर (४६, रा. सनवे मेगापोलीस फेज तीन, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश रविवारी रात्री मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्यांनी स्विफ्ट कार बुक केली. कारमधून जात असताना भूमकर चौकात आणखी दोघेजण कारमध्ये बसले. त्या दोघांनी मुकेश यांना चाकूचा धाक दाखवला. मुकेश यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य वस्तू असा एकूण एक लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि मुकेश यांना अज्ञात ठिकाणी सोडून दिले. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.