जबरी चोरीच्या प्रयत्नात असताना तिघांना अटक

बार्शी : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलिसांना  मिळालेल्या माहितीच्या आधारे बार्शी कुर्डवाडी रोडवर शेंद्री शिवारात तिघा जणांना पोलिसांनी जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना धारदार शस्त्रासह अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रांसह दोन लाख अठ्ठेचाळीस हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयापुढे उभे केले आसता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

अशोक राजू भोसले (वय २०), सिद्धू बाबू काळे (वय २५, दोघे राहणार परंडा रोड, कुर्डवाडी, तालुका माढा) व अनंता शहाजी शिंदे (वय १९ रा. शेळगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींकडून पोलिसांनी एक धारदार लोखंडी सुरा, एक कोयता व फोल्डिंगचा चाकू या शस्त्रांबरोबरच दोन धातूंच्या प्लेट, सात लहान मोठ्या धातूंचे घंटा, चार जोड जोडवी व २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड असा २ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसात पोलीस नाईक योगेश मंडलिक यांनी फिर्याद दिली आहे. सदरची कामगिरी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी राजू मंगरुळे, शिरसठ, ठोंगे, लोहार, लाड यांनी केली. बार्शी कुर्डवाडी रोडवर शेंद्रि गावाजवळील आदर्श हॉटेलजवळ तीन इसम उभे होते. पोलिसांना पहाताच ते दोघे पळू लागले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

याबाबत बार्शी पोलिस ठाण्यात  भा. द. वी. ३९८ अन्वये गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत.

You might also like