भाजप नेत्यानं दिला इशारा, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटली आहे. प्रशासनात समन्वय साधून तात्काळ सुधारणा करावी. अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिला आहे.

बारामतीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावरून दिलीप खैरे यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले. त्यानंतर खैरे म्हणाले, ‘तालुक्यातील निवडक मंडळींसाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन राबत असल्याचे चित्र दुर्दैवाने तयार झाले आहे. प्रशासनात समन्वय साधून तात्काळ सुधारणा करावी. अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले जाईल. खरेतर ही वेळ राजकारण करण्याची नाही किंवा आरोग्यव्यवस्था पुरवताना दुजाभाव करण्याची वेळ नाही. मात्र, ज्या पद्धतीने आरोग्यव्यवस्था व प्रशासनाचे केवळ शहरात तेही काही ठराव व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या हाती केंद्रीकरण झाले आहे ते पाहता तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील सर्वसामान्यांना कोणी वाली नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे’.

तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बारामती शहर व तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे दिसत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची सरासरी संख्या 350 वर आहे. कोरोना उपाययोजनेत शहरी-ग्रामीण असा भेदभाव केला जात आहे, असेही खैरे यांनी सांगितले.

खाजगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट

गरीब-श्रीमंत असा दुजाभाव त्वरीत थांबवावा, खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट व्हावे, प्रत्येक मंडलामध्ये कोविड चाचणी केंद्रे सुरु करावीत, प्रशासनाने रेमडेसिव्हिरचा रुग्णसंख्येनुसार न्याय पुरवठा करावा, अशी मागणीही दिलीप खैरे यांनी केली आहे.