…तर ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथील ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब चेडे यांना सरपंच पती भागवत बलभीम लव्हाट यांनी केलेल्या मारहाणीचे ग्रामसेवक संवर्गात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेनंतर आरोपीच्या अटकेसाठी शेवगाव तालुक्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. याशिवाय घटनेनंतर फिर्याद देण्यास गेलेल्या ग्रामसेवकांना शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी अपमानास्पद वागणूक देवून तब्बल दहा तास ताटकळत ठेवले. या प्रकाराचीही चौकशी करून पोलिस निरीक्षक ढिकले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केली आहे. तसेच मारहाण प्रकरणातील आरोपीला अटक न झाल्यास जिल्ह्यातील ग्रामसेवक काम बंद आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामसेवकाला झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक युनियनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून सदर घटनेचा निषेध केला आहे. या निवेदनावर राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे, शेवगाव तालुका अध्यक्ष भैय्यासाहेब कोठुळे, तालुका सचिव संपत गोल्हार, बापूसाहेब चेडे, जालिंदर कोठुळे, बाळासाहेब नजन, विठ्ठल आव्हाड, राजेंद्र पावसे, नगर तालुका अध्यक्ष शहाजी नरसाळे, युवराज पाटील यांच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, दि.१६ जुलै रोजी वरूर बु.येथे सरपंच पती भागवत लव्हाट यांनी ग्रामसभेत न झालेल्या बेकायदेशीर ठरावाची मागणी ग्रामविकास अधिकारी चेडे यांच्याकडे केली. त्यास नकार दिला असताना लव्हाट यांनी चेडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत ग्रामसेवक शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता त्यांना तक्रार नोंदवून घेण्याऐवजी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पोलिस निरीक्षक ढिकले यांनी युनियनच्या पदाधिकार्‍यांशीही अरेरावी करीत त्यांनाच बाहेर जाण्यास सांगितले तसेच गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवली. अखेर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या फोनननंतर तसेच गट विकास अधिकारी स्वत: पोलिस ठाण्यात आल्यावर फिर्याद नोंदविण्यात आली.

पोलिसांनी शासनाच्या इतर विभागातील कर्मचार्‍यांशी सहकार्य करणे अपेक्षित असताना पोलिस निरीक्षक ढिकले यांनी कर्मचार्‍यांनाच उध्दट वागणूक दिली आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मारहाण प्रकरणातील आरोपी लव्हाट याला अटक होईपर्यंत काम बंद आंदाेलन चालूच ठेवण्याचे व जिल्हाव्यापी काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त