.. तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी, शिवसंग्रामचे नेते आ. मेटे यांचा भाजपा इशारा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   येत्या काळात भाजपाकडून सन्माानजनक जागा दिल्या तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे, असा इशारा शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपला दिला आहे.

शिवसेनेसोबत अनेक वर्षांपासून असलेली युती तुटल्यापासून महाराष्ट्रात भाजपासोबत एकही मोठा मित्रपक्ष उरलेला नाही. त्यातच आता राज्यातील छोटे मित्रपक्षही दुरावू लागले आहेत. त्यात आता आ. मेटे यांनी देखील त्यांच्यासोबतची युती तोडण्याचे संकेत दिले आहेत.

याबाबत आ. मेटे म्हणाले की, येत्या काळात भाजपाकडून सन्मानजनक वागणूक मिळाली तर आम्ही युती करू. अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आम्ही केली आहे. तसेच आगामी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसंग्राम उतरणार आहे. युती झाली किंवा न झाली तरी येथे दोन आकडी नगरसेवक निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही विनायक मेटे यांनी केला आहे.

वळ संभाजीनगर लिहून नामांतर होणार नाही, आ. मेटेंचा सेनेला टोला

आ. मेटे यांनी यावेळी औरंगाबादच्या नामांतरावरूनही शिवसेनेला टोला लगावला आहे. केवळ सामनामध्ये किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहिल्यामुळे शहराचे नामांतर होणार नाही. त्यासाठी नोटिफिकेशन काढावे लागते. सध्या आपले ठेवायचे झाकून आणि लोकाचे पाहयचे वाकून अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. असा चिमटाही विनायक मेटे यांनी काढला.