… तर मग काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. केवळ सहा मंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप करून ठाकरे सरकार हिवाळी अधिवेशनाला सामोरे गेले आहे. मात्र आता काँग्रेसला जर ग्रामीण भागात काम करता येईल अशी महत्वाची खाती मिळाली नाही तर काँग्रेस सरकारला बाहेरून पाठींबा देण्याचा विचार करेल अशी चर्चा सध्या काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुरु आहे.

शिवसेनेकडे असलेले गृहमंत्रीपद देखील राष्ट्रवादीला देण्यात येणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडूनही महत्वाच्या खात्यांची मागणी केली जात आहे. तर अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण अशा नेत्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले तर राष्ट्रवादीवर लक्ष ठेवणे सोपे जाईल अशी देखील चर्चा काही काँग्रेस आमदारांमध्ये सुरु आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी अधिक जवळ येत असल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये देखील आक्रमता वाढत चालली आहे. काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना मंत्रिमंडळासंबंधीच्या बाबतची माहिती घेण्यासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. काँग्रेसकडून मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी अमित देशमुख, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम असे तरुण चेहरे देखील उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसकडून अल्पसंख्यांकांना जवळ करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांचे मंत्रिमंडळातील स्थान निश्चित मानले जात आहे.

सुकाणू समिती
हे सरकार तीन पक्षांनी मिळून एकत्र येत स्थापन केलेले सरकार आहे त्यामुळे व्यवस्थित रित्या सरकार चालण्यासाठी पक्ष आणि मंत्रीस्तरावर दोन समित्या स्थापन केल्या जाणार आहे. यासाठी काँग्रेसकडून सोनिया गांधी यांनी खर्गे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव सुचवले आहे. मात्र या सुकाणू समितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/