केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘… तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath-khadse) यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने भाजपाला काहीच फरक पडणार नाही. त्यांच्यासोबत एकही आमदार, खासदार जाणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (-union-minister-bjp-raosaheb-danve) यांनी केला आहे. खडसेंना प्रदेशाध्यक्षपद देऊनही त्यांनी ते नाकारले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले. जर खडसे प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते कदाचित मुख्यमंत्री झाले असते, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला आहे. तसेच खडसेंचा वापर राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी नये असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

दानवे म्हणाले की, खडसेंना प्रदेशाध्यक्षपदापेक्षा मंत्रीपदात जास्त रस होता. परिस्थिती सुधारणार नाही, असे वाटत असल्याने त्यांनी राजीनामा दिला असावा. नाथाभाऊ आमचे नेते आहे. त्यांनी पक्ष सोडला याचे दुःख आहे. परंतू पक्ष एका माणसावर अधारीत नसतो. कार्य़कर्ते गावागावात आहे. नाथाभाऊसोबत एकही आमदार किंवा खासदार जाणार नाही, याची खात्री असल्याचे ते म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. म्हणून चिंता नाही, तसेच खडसे हा विषय भाजपसाठी संपलेला असल्याचे ते म्हणाले.
मी नाथाभाऊंच्या घरी, फार्महाऊसवर, सरकारी बंगल्यावर गेलो होतो. मी त्यांना समजावल नाही. पण राजकारणावर दिर्घ चर्चा केली. जे चालू आहे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हीना गावीत, सुभाष भामरे, रक्षा खडसे असे अऩेक नेते आहे. भाजपने राष्ट्रवादीला 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवल आहे. त्यामुळे खडसेंना प्रवेश देऊन हे नुकसान भरून काढता येते का,यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या जाण्यांने काहीच फरक पडणार नाही, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दानवे बोलत होते.

खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

खडसे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. खडसे यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे ( (rohini Khadse) या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तुर्तास खडसे यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे या भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

खडसे यांचा राजकीय प्रवास कसा होता

1980 मध्ये खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रीय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया भक्कम करण्यात त्यांचा वाटा मोठा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसे यांच्याकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यांनी कोथडी ग्रामपंचायतची पहिली निवडणूक
लढवली होती. मात्र पहिल्याच निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुढे 1987 मध्ये त्याच कोथडीचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये ते मुक्ताईनगरमधून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा वेळा ( 1989 ते 2019) म्हणजे तब्बल 30 वर्षे मुक्ताईनगरचा बालेकिल्ला खडसे यांच्याकडे होता.

1995 ते 99 या युतीच्या काळात त्यांनी अर्थ आणि सिंचन या दोन खात्याचे मंत्री म्हणून जाबादारी स्विकारली. त्यांनी 2009 ते 2014 या काळात विरोधीपक्षनेता म्हणून काम पाहिले. 2014 मध्ये खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. पण फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल खात्याची धूरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.2019 विधानसभा निवडणूकीत भापनाने त्यांना तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिले गेले. मात्र यात त्यांचा पराभव झाला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकवेळा विधानसभेत सरकारला धारेवर धरले आहे. आकडेवारी आणि पुराव्यासह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत असत. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना खडसे यांनी सलग आठ तास भाषण करून विक्रम नोंदविला. या भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखऱ यांनी खडसे यांचा विशेष सन्मान केला होता.