… तर उद्याच राजीनामा देतो’, खा. संभाजीराजे आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणावरुन छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी सोलापूर येथे दिली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा संघटना बैठका घेऊन रणनिती आखत आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहे. आज सकाळी त्यांनी कोल्हापुरातून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात केली. कोल्हापूरातून सुरु झालेला हा छत्रपती संभाजीराजेंचा दौरा पंढरपूर, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक आणि शेवटी मुंबई असा असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. 28 मे रोजी ते मुंबईत येऊन मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत. कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात हा दौरा नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करत आहे. अनेक अक्षरं भाषांतरीत झाली नाही त्यामुळे फटका बसला. लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केला असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरवस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याचे काम राज्याने कारावे. माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सप्टेंबर 2020 पूर्वीच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात, असे देखील त्यांनी म्हटलं आहे. घराण्याचा वंशज म्हणून समाजाचा घटक म्हणून मी भूमिका घेतोय. भारताच्या इतिहासात संसदेत पहिल्यांदा आंदोलन करणारा मी पहिला खासदार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.