…तर बरं झालं असतं, अजित पवारांच्या ‘बंडा’वर धनंजय मुंडेंचं ‘सूचक’ विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात चालू असलेल्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राजीनामा दिला आणि राज्यातील सरकार कोसळलं. त्यामुळे राज्यात भाजपच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला असून, उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण अजित पवार जेव्हा भाजपाच्या कंपूत सहभागी झाले होते, तेव्हा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि महाविकास आघाडीच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो का असे चिन्ह दिसत होते. त्या दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणती भूमिका घ्यायची, हा पेच देखील निर्माण झाला होता. त्या सगळ्या घटनाक्रमावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंनी सांगितलं की काही गोष्टी झाल्या नसत्या तर बरं झालं असतं. सकाळी जो शपथविधी पार पडला त्याबद्दल मला काही कल्पनाच नव्हती. तसेच रात्री दोन वाजता येऊन मी मित्राच्या घरी थांबलो होतो. आणि दुपारी १ वाजता उठलो, त्यावेळी समजलं की असं काही झालं आहे. दरम्यान, तोपर्यंत मला कोणी उठवलं नाही. चार वाजता बैठक होती तिकडे गेलो. मी पक्षासोबत आणि पक्ष नेतृत्वासोबत आहे असे सांगितले. तुम्हाला आता कुठे आलबेल दिसत नाही ते सांगा. त्यापुढे जाऊन त्यांनी सांगितले की, दादांनी राजीनामा दिला तो विषय संपला. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं, मी राष्ट्रवादीचाच नेता आहे आणि मी साहेबांनाच नेता मानतो.

भाजपमध्ये मिळालेल्या दुय्यम वागणुकीमुळे शिवसेनेने आपला निर्णय शेवटपर्यंत न बदलता मुख्यमंत्री पदावर ठाम भूमिका घेतली. परिणामी भाजपसोबत युती तोडून शिवसेनेने आपले रस्ते बदलले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तास्थापनेचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तास्थापनेचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एका रात्रीत राजकीय गणितं बदलली आणि भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस आधीच अजित पवारांनी राजीनामा देऊन घरवापसी करत आपण राष्ट्रवादीतच अशी भूमिका घेत भाजपाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.