‘… तर लॉकडाऊन टाळता येणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे काही म्हणाले ते योग्यच आहे. लोकांनी शिस्त पाळायला हवी, हजारोंच्या गर्दीत जाणं टाळायला हवं. मास्क वापरणं गरजेचं आहे. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात गर्दी केली नाही तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. परंतु मुंबईत सध्या वेगळचं चित्र आहे. हजारो लोक मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. त्यामुळं लॉकडाऊन टाळता येणार नाही. पुढील 8 ते 15 दिवस मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचे आहेत असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी दिला.

चहल यांनी सांगितलं की, आपल्याकडे दोन व्हिडीओ आले आहेत. एका व्हिडीओत चौपाटीवर हजारोंच्या संख्येनं मुंबईकर बाहेर पडले असून तिथं विनामस्क फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर आणखी एका व्हिडीओत लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून त्यातही अनेकांनी मास्क लावलेलं नाही. पबमध्येही अशीच स्थिती असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा सगळा बेशिस्तपणा आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

रुग्णवाढीला ब्रेक
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढत असलेल्या रुग्णावाढीला सोमवारी हलका ब्रेक मिळाल्याचं दिसून आलं. सोमवारी दिवसभरात एकूण 5210 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी एका दिवसात 7 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील वाढत्या रुग्णवाढीला हलका ब्रेक मिळाला आहे. यामुळं तात्पुरता दिलासा मिळाला आहे.