Aurangabad News : …तर पुन्हा Lockdown लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारकडून अलर्ट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात सर्व व्यवहार हळूहळू सुरू झाले असताना नागरिकांनी आरोग्य विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. विदर्भात रुग्णवाढीचा दर सर्वाधिक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, त्या भागात टेस्टिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मास्क न घालणे, शारीरिक अंतर न पाळणे, अनावश्यक गर्दी करणे, स्वच्छता न पाळण्याच्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाबाबत नियम पाळले जात नाहीत हे दुर्दैवी आहे. जर नियम पाळले जात नसतील तर पुन्हा लॉकडाऊनकडे जाण्याची शक्यता असल्याचा अलर्ट टोपे यांनी दिला आहे.

मुंबईत लोकल सुरू झाल्याने कोरोना वाढत आहे, असे म्हणणे योग्य नाही. पुन्हा लोकल बंद करणे हा शेवटचा पर्याय आहे. 28 तारखेला आरोग्य भरती सुरू होणार आहे. सध्या 50 टक्के भरती होणार आहेत. यात 17 हजारांपैकी 8500 जागा भरल्या जाणार आहेत. मार्चपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होईल असे नियोजन आहे. राज्यात सर्व विभागातील ज्या भरती होणार त्यापैकी फक्त 50 टक्के जागा भरल्या जातील. उरलेल्या जागा या आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर लगेच भरल्या जाणार असल्याचे टोपे म्हणाले.