… तर ‘त्या’ शहरांमध्ये Lockdown लागू करण्यात येईल, CM ठाकरेंनी केलं स्पष्ट (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे संकट हे दूर झालेले नाही. आपल्याला कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केलं. परंतु ज्या भागात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशा भागात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात अनलॉक दरम्यान अनेक व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. मात्र, अनलॉकमध्ये राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता सगळी दुकानं सुरु झाली म्हणून सगळं काही सुरु झालं असं समजू नका. आपणहुन कोरोनाला बळी पडू नका. एकमेकांपासून अंतर ठेवा. नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक शहरांकडून लॉकडाऊन वाढवण्यात येणार का अशी विचारणा राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, लॉकडाऊनबद्दल काही शहरं विचारणा करत आहेत. पण लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा तुमच्यावर सोपवणार आहे. त्यामुळे काही भागात जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले तर त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.