…तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज लागणार नाही : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मुला-मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले तर राज्यात आरक्षणाची गरज भासणार नाही असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारने तरूणांची फसवणूक केली. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे त्यावरून राज्य सरकारने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आरक्षणाचा निर्णय झाला त्यावेळी पेढे वाटण्यात आले. आता पेढे वाटणारे नेते कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दुष्काळावरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केले, दुष्काळाची कामे केली आहेत तर मग दुष्काळ का जाहीर करवा लागला, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना त्यांनी दुष्काळाचा प्रश्न का निर्माण झाला ? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या असे प्रश्न देखील त्यांनी राज्य सरकारला विचारले. अभ्यास दौऱ्यांवर फुकटचा खर्च केला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशाची खिल्ली उडवली जात असल्याचे सांगत मोदींवर निशाणा साधला. मी सरकारच्या विरोधात बोललो, कारण सरकारने कोणतीच कामे केली नाहीत. जनतेला फक्त स्वप्न दाखवून त्यांचा भ्रमनिरास केला.

त्यांनी जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असूद्या त्याविरोधात बोललच पाहिजे असे राज ठाकरेंनी म्हटले. काँग्रसने कामे केली नसती तर त्यांच्या विरोधात देखील बोललो असतो. समजा उद्या माझं सरकार आले, मी चूका केल्या फसवणूक केली तर माझ्याविरोधातही बोललं पाहिजे, असेही राज ठाकरेंनी पत्राकार परिषदेत म्हटले.