बॉलीवूड-भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास करणार, गृहमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच बॉलिवूड आणि भाजपच्या ड्रग्ज कनेक्शनचीही चौकशी एनसीबीकडून होत नसल्याची तक्रार काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. यावर एनसीबीने तपास न केल्यास मुंबई पोलिसांकडून याचा तपास करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.16) सह्याद्री अतिथीगृहात गृहमंत्री देशमुख यांची भेट घेतली. बॉलिवूड आणि भाजप ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने 31 ऑगस्टला केली होती. आज याच मागणीचा पुनरूच्चार करण्यात आला. त्याला गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सावंत यांनी सांगितले.

सावंत म्हणाले की, भाजप आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे आणि माहितीवर एनसीबीने कार्यवाही केली नाही. चित्रपट निर्माता संदीप सिंह आणि विवेक ओबेरॉय याचे नाव येत होते. ड्रग्ज कनेक्शन संदर्भात बंगळुरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही, याचे आश्चर्य वाटते.

कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचारात सामील झालेली अभिनेत्री रागिनी द्विवेदी ही चंदन ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्यासोबत 12 लोकांवर ड्रग्ज पेडलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 12 लोकांमध्ये आदित्य अल्वा नवाचा व्यक्ती फरार असून तो विवेक ओबेरॉयचा मेव्हणा आहे. ही माहिती चौकशीकरिता दिली होती, मात्र एनसीबीने यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. तसेच संदीप सिंहने महाराष्ट्र भाजप कार्यालयात 53 वेळा कोणाला फोन केला याचे उत्तरही अद्याप मिळू शकले नसल्याचे सावंत म्हणाले.