..मग चौकीदार नेमकं करतो तरी काय ?’ असे म्हणत राज ठाकरेंची मोदी आणि फडणवीसांवर सडकून टीका

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नेरंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवतात मग चौकीदार नेमकं करतो तरी काय ? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपली तोफ डागली. बीडमधील महिलांचे गर्भाशय विकण्याच्या प्रकारावरून राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. नांदेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

‘चौकीदार नेमकं करतो तरी काय ?’

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “नुकताच एक प्रकार माझ्या कानावर आलं की, बीडमध्ये महिलांचे गर्भाशय विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वेगवेगळी कारणे सांगून महिलांची गर्भाशये विकली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवतात मग हा चौकीदार नेमकं करतो तरी काय?” असे म्हणत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी बीडच्या गर्भाशय विकण्याच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला.

याशिवाय, “नरेंद्र मोदी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातील दुष्काळ, महिलांची सुरक्षा, तरुणांची बेरोजगारी, गेल्या पाच वर्षातील विकासकामे अशा प्रश्नांवर बोलायला मोदी तयारच नाहीत” असेही राज ठाकरे म्हणाले.

‘महाराष्ट्रातील पाणी गुजरातला नेले जातंय’

पुढे बोलताना ते म्हणाले की, “राज्यात गंभीर पाणी प्रश्न असताना महाराष्ट्रातील पाणी गुजरातला नेले जात आहे. मराठवाडा, नाशिकचं पाणी हे गुजरातकडे वळण्याचं काम सुरु आहे.” असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज्यातील तब्बल 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असेही राज यांनी सांगितले.

‘निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी सरकार थापा मारत आहे’

मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाष्य करताना मराठवाड्यातील दुष्काळ असाच राहिला तर मराठावड्याचा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही असे सांगत राज ठाकरे म्हणाले की, “राज्यातील तब्बल 24 हजार गावं, 151 तालुके दुष्काळाने होरपळत आहे. राज्यात 1 लाख 20 हजार विहीरी बांधल्या असं सरकार थापा मारत आहे. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी सरकार खोटं बोलत आहे. जर सरकारने विहिरी तयार केल्या आहेत तर त्या कुठे गेल्या.” असे म्हणत राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.