आवै दौ करौना-फरौना… ‘कोरोना’ बाबत जनजागृती करणाऱ्या महानायकाचा बंगला सील !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याने अमिताभ यांच्या चारही बंगल्यांना आज तडकाफडकी सील करण्यात आले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि बी-टाऊनमध्ये एकच खळबळ उडाली. पाठोपाठ अमिताभ लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना सुरु झाली.

राजकीय नेत्यांपासून तर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसह अनेकांनी अमिताभ लवकर बरे व्हावेत, अशी कामना करत सोशल मीडियावर ट्विट केलेत. ट्विटरवर काही मिनीटात #AmitabhBachchan आणि #AbhishekBachchan हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आलेत. अभिनेता अनुपम खेर, तापसी पन्नू, सोनम कपूर अशा अनेकांनी अमिताभ व अभिषेक लवकरच बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. बॉलिवूडप्रमाणेच मामूटी, महेश बाबू या दाक्षिणात्य कलाकारांनीही बिग बी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिषेक बच्चन यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्य याची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र या दोघींची दुसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे जया बच्चन वगळता सर्व बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बच्चन कुटुंबीयांसाठी देशभरातून चाहते प्रार्थना करत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवरही बच्चन कुटुंबीयांसाठी गेट वेल सूनचे मेसेज लिहिण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी कोरोना जनजागृतीचा संदेश दिला होता. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी भोजपुरीमध्ये कोरोना जनजागृतीपर एक कविताही लिहिली होती. चलौ हमऊं कर देत हैं जैसन बोलत हैं सब, आवै दौ करौना-फरौंना ठेंगवा देखाउब तब, असे आपल्या अंदाजात म्हणत अमिताभ यांनी कोरोनाला पळवून लाऊ असा संदेश दिला होता.

आता खुद्द अमिताभ यांच्यासह आज त्यांच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने सर्वच खळबळ उडाली असून अमिताभ यांनी केलेल्या जनजागृतीसंदर्भातही चर्चा होत आहे. दरम्यान, बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा परिसर प्रशासनाने सील केला आहे. आज सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुहू येथे जाऊन अमिताभ बच्चन यांच्या जनक, प्रतिक्षा, वत्सा आणि जलसा या चारही बंगल्यांचे सॅनिटायझेशन केलं.