महिना होत आला तरी बिले नाहीत : शेतकरी नेत्यांची तोंडे गप्प का?

राजू थोरात / सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- सांगली जिह्यातील साखर कारखानदारांनी परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा एफआरपीचा कायदा पायदळी तुडवला आहे. गळीत हंगाम सुरु होऊन महिना होत आला, तरीही एका ही कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देण्याचे धाडस केलेले नाही. हंगामापूर्वी गर्जना करणाऱ्या शेतकरी नेत्यांची तोंडेही आता बंद झाली आहेत. त्यामुळे यंदाही एफआरपी वेळेत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

यंदा शेतकरी संघटनांनी नांगी टाकल्याने जिह्यात दोन नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम सुरु झाला. जिह्यातील 15 खासगी व सहकारी साखर कारखान्यांची धुराडी पूर्ण क्षमतेने पेटली आहेत. यामध्ये श्री दत्त इंडिया (वसंतदादा), राजारामबापू पाटील, साखराळे, विश्वासराव नाईक, हु़तात्मा किसन अहीर, माणगंगा, श्री महांकाली, राजारामबापू पाटील, वाटेगाव, सोनहिरा, क्रांती, सर्वोदय, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, केन ऍग्रो, उदगिरी व सद्गुरु श्री श्री या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

एफआरपीचा कायदा पायदळी

यंदा एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला. त्यामुळे ऊस उत्पादकांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्याचा त्याच्या शेतातील ऊस तुटल्यापासून त्याला 14 दिवसांच्या आत बिल देणे एफआरपीच्या कायद्याने बंधनकारक आहे. मात्र गेल्या अनेक हंगामात हा कायदा साखर कारखानदारांनी कधीच पाळलेला नाही. यंदाही तीच परिस्थिती आहे. एकरकमी एफआरपी देतो म्हणणाऱ्यां कारखानदारांनी ती कधी देणार हे स्पष्ट केलेले नाही. दोन नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरु झाला आहे. सुमारे दहा लाख मे.टन. उसाचे गाळप झाले आहे. त्याला आता महिना होत आला तरीही कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे बिले दिलेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शेतकरी नेत्यांची तोंडे गप्प

साखर कारखानदारांनी मनमानी सुरु असताना शेतकऱ्यांचे नेते अशी मिजाश मारणाऱ्यांची तोंडे मात्र आता बंद झाली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेसह आंदोलन अंकुश आदी संघटनांनी याबाबत आवाज उठविण्याची गरज आहे. मात्र या सर्व संघटनांच्या नेत्यांची तोंडे गप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर आमदार, खासदार झालेले राजू शेट्टीही कारखानदारांशी संधान साधत राज्यभर फिरत आहेत. ज्या कारखानदारांच्या छाताडावर नाचण्याची भाषा शेट्टी करत होते, त्याच कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात ते धन्यता मानत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली उरला नसल्याचा गैरफायदा कारखानदारांकडून उठविण्यात येत आहे.

पाच कारखान्यांना गाळप परवानाच नाही

थकीत एफआरपी असलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याची अंमलबजावणी साखर आयुक्तांनी केली. जिह्यातील पाच साखर कारखान्यांना या निर्णयाचा तडाखा बसला आहे. यामध्ये श्री दत्त इंडिया, श्री महांकाली, माणगंगा, निनाईदेवी व केन ऍग्रो या साखर कारखान्यांचा समावेश आहे. गाळप परवाना नसतानाही या कारखान्यांनी गाळपास सुरूवात केली आहे. या कारखान्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस साखर आयुक्त दाखवत नसल्याने बेकायदेशीरपणे हे कारखाने सुरु आहेत. याबाबत शेतकरी संघटनांनी तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे शासन, साखर आयुक्तांसह सर्वच यंत्रणा या कारखान्यांना पाठीशी घालत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

राजू शेट्टींची विश्वासार्हता संपली

खा. राजू शेट्टींनी खासदारकी टिकविण्यासाठी आटापिटा सुरु केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ज्या शरद पवार यांना शेट्टींनी हयातभर शिव्या दिल्या. त्यांच्या घरासमोर आंदोलने केली. त्यांच्याच वळचणीला शेट्टी जात असल्याने ऊस उत्पादकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा बदलत्या भूमिकेमुळे शेट्टींची विश्वासार्हता संपली असल्याची भावना ऊस उत्पादकांच्यामध्ये निर्माण झाली आहे.