महाविकास आघाडीत काँग्रेसचे नाराजीनाट्य, चव्हाण-थोरात घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज आहेत. यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद आहेत. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मतभेद असलेल्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. येत्या दोन दिवसांमध्ये ही भेट होऊ शकते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक झाली आहे. सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणी या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली होती. या बैठकीनंतर आता काँग्रेस नेते त्यांची मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत.

यापूर्वी, थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी थोरात यांना दिले आहे. यावेळी बोलताना, तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचे तर तीन पक्षाचे सरकार आहे, असे थोरात म्हणाले होते. मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सोमवारी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवू असे थोरात म्हणाले.