माझ्यावर देखील दडपण होतं, पण जर मी खचलो असतो तर…

पोलिसनामा ऑनलाइन – आयुष्याचं युद्ध आपण रोज लढत असतो. शेवटी हे युद्ध आहे. परंतु, आयुष्य सुरू असताना अचानक त्याला ब्रेक लागणं. आणि हे लोकांच्या मनावर अतिशय विचत्र पद्धतीनं आघात करत होतं. लढणं आहेच, लढण्याशिवाय पर्याय नाही. हार माननं तर शक्य नाही. मोठी जबाबदारी आहे. लढल्याशिवाय आपण यातून बाहेर पडू शकत नाही. या सगळ्यातून सावरण्याचं दडपण माझ्यावर देखील होतं. पण जर मी खचलो असतो तर काय? हा एक मुद्दा होता. कोविड योद्धा म्हणून इलेक्ट्रानिक मीडियामधील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की “लॉकडाउन सुरू होण्याअगोदरपासून मी केंद्र सरकारशी स्थलांतरीत मजुरांबाबत बोलत होतो. त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची मागणी केली जात होती. परंतु तेव्हा केंद्रकडून तयारी दर्शवली गेली नाही. ज्या काळात त्यांना जाऊ दिलं पाहिजे होतं. तेव्हा आपण त्यांना थांबवलं व जेव्हा जाऊ द्यायला नको होतं, तेव्हा आपण त्यांना जाऊ दिलं. कारण, तेव्हा पर्यायच उरलेला नव्हता. मग हे मजूर सर्व ठिकाणी पसरायला लागले. शेवटी त्यांना आहे तिथेच थांबण्यासाठी ठिकठिकाणी छावण्या काढव्या लागल्या. सहा ते सात लाख मजुरांना किमान एक महिना तरी आपण सर्व प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न केला. कोरोना विरोधात लढण्यासाठी आतातरी आपल्याकडे मास्क हेच एकमेव आयुध आहे. तसेच, हात धुणे व अंतर ठेवणे हे देखील महत्वाचे आहे. कारण, वॅक्सीनचा अजूनही काहीच पत्ता नाही. ”

आपण सर्वजण सोबत आहोत. आपली साथ महत्वाची आहे आणि हा आत्मविश्वास लोकांचा मनात जागवणं गरजेचं आहे. ही मोठी जबाबदारी आहे. लढल्याशिवाय आपण यातून बाहेर पडू शकत नाही. सोबतीला सर्वजण आहेत, हा जेव्हा विचार मनात येतो. तेव्हा आपण लढू शकतो, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.

… अजूनही धोका टळलेला नाही

“अनावश्यक गर्दी टाळणं हे फार महत्वाचं आहे. मास्क वापर, हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे जर का आपण पाळलं, तर मला असं वाटतं आपण या संकटावर मात करू शकतो. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे. दिवसा लॉकडाउन आपण करू शकत नाही, तशी वेळ नाही आणि आपल्यावर तशी वेळ देखील येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर एक धोक्याची जाणीव असते. अजूनही धोका टळलेला नाही, आता दोन दिवसांपासून नाईट कर्फ्यू सुरू झाला आहे. यावर अनेकांनी प्रश्न विचारले की, हा कोरोना काय रात्रीच मोकाट सुटतो व दिवसा घरात बसतो काय? तसं नाही, शेवटी एक छोटीशी जाणीव जनतेला करून देण्याची आवश्यकता असते.”