अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील दरी वाढत चालली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्याला हवे तसे निर्णय न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे जाहीररीत्या चारित्र्य हनन करून त्यांच्या बदल्या करण्यापासून त्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही त्याला कारणीभूत ठरू लागल्याने ‘विकासाला’ खिळ बसत आहे. दरम्यान सोमवारी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी आज महापालिका कामगार युनियन आणि अभियंता संघाने काम बंद आंदोलन आणि निषेध सभा आयोजित केली आहे.

पुणे महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष पराकोटीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये आयुक्तांना भर सभेत बांगड्याचा आहेर करण्यापासून तर महिला अधिकाऱ्यांचे चारित्र्य हनन करण्यापर्यंत प्रकार घडत आहेत. तसेच अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यलयातच मारहाण करण्याचे प्रकारही सातत्याने होत आहेत. मध्यंतरीच्या काळात तर आपल्याला हवे तसे निर्णय न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर भरसभेत ताशेरे ओढत राजकीय बळाचा वापर करून त्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. तसेच नेहमी चर्चेत राहिलेल्या अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. सोमवारी तर महापौर कार्यलयात चक्क महापौरांसमोर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या आंदोलनादरम्यान शाब्दिक बाचाबाची दरम्यान एका कार्यकर्त्याने अतिरिक आयुक्तांना धक्काबुक्की केल्याने या घटनांनी कळस गाठला आहे.

सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे अधिकारी आणि कामगारांचे मनोबल घटत चालले असून काही अधिकारी दाबावाखाली चुकीच्या कामकाजाचा पायंडा पाडत आहे. यामध्ये नुकसान होते ते पुणेकरांच्या करातून होणाऱ्या लाखो रुपयांच्या पैशांचे. यामुळे कागदावर विकासाची स्वप्ने मोठी दिसत असली तरी तो विकास होण्यासाठी बराच काळ लागत असून पुणेकरांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने याला सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही जबाबदार आहेत. कामे होत नसल्याने नवीन नगरसेवकांमध्ये नैराश्याचे वातावरण असून अधिकारी आणि कामगार वर्गाची मानसिकताही बिघडत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान सोमवारी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या धक्काबुकी चा निषेध करण्यासाठी महानगरपालिका कामगार युनियन आणि अभियंता संघाने आज कामबंद आंदोलन पुकारले असून सकाळी अकरा वाजता पालिका भवन समोरील हिरवळीवर निषेध सभेचे आयोजन केले आहे, असे अभियंता संघाचे सचिव सुनिल कदम यांनी कळविले आहे.