Coronavirus : देशात कम्युनिटी लागण झाली का ? आरोग्य मंत्रालयानं केला ‘हा’ मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता देशात लॉकडाऊन आणि विदेशातून होणारी हवाई वाहतूक देखील बंद आहे. पण देशांतर्गत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना भीती आहे ती कम्युनिटी लागण झाली का याची ? मात्र आरोग्य मंत्रालयाने यावर मोठा खुलासा केला आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना कम्युनिटी संसर्गाबाबत खुलासा केला. देशात अजुनही कम्युनिटी लागण झाल्याचे ठोस पुरावे नसल्याचे त्यांनी सांगितले. कम्युनिटी लागण म्हणजे बाहेरून संक्रमण घेऊन आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात न येताही झालेलं संक्रमण असं म्हणता येईल. यात समाजातल्या विविध घटकांना त्यांची लागण होत असते आणि त्याचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. लॉकडाऊनमुळे देशात मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

नरेंद्र मोदी सरकारने कोरोना विरुद्धची लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची संख्या दररोज वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नसल्याचे मत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. सरकार एका मोठ्या योजनेवर काम करत असून येत्या 31 मे पासून तब्बल एक लाख लोकांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी लागणाऱ्या टेस्टिंग किट्स या देशातच तयार केल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 29 हजाराच्या जवळपास गेली आहे. तर मृत्यूचा आकडा देखील 900 च्या वर गेला आहे. त्यामुळे कोरोना टेस्टिंग वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. टेस्ट करण्यासाठी चीनमधून 5 लाख किट्स आयात करण्यात आल्या होत्या. मात्र, या निकृष्ट दर्जाच्या असल्याने सरकारने त्याचे कंत्राटच रद्द केलं आहे. आता अशा प्रकारचे किट्स भारतातच बनवले जाणार असून त्यासाठी आयसीएमआरची मान्यता पाहिजे. आम्ही त्याची वाट पहात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.