नियंत्रण कक्षावर अधिकाऱ्यांचेच ‘कंट्रोल’ नाही

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय होण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रयत्नातून अखेर पाच महिन्यापूर्वी आयुक्तालय सुरु झाले. नवीन आयुक्तालय सुरु होऊन पाच महिने उटले असताना देखील नियंत्रणकक्षाचा कारभार अद्याप सुरळीत सुरु झाला नाही. नियंत्रणकक्षाची  जबादारी उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यावर आहे. मात्र, याच अधिकाऱ्यांचे नियंत्रण कक्षावर ‘कंट्रोल’ राहिलेले नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे पहिले पाढे पंच्चावन्न असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

सुरुवातीला नवीन संसार म्हणून तेथे असणाऱ्या सर्व गैरसोयीकडे व कामकाजाकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र पाच महिन्यांनी देखील परिस्थीती जैसेथे राहिल्याने नागरिकांनी आता अजून किती दिवस हेच चालणार असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. मंगळवारी (११ डिसेंबर) इंटरनेट अभावी कंट्रोलरूमचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. याबाबत चैकशी केली असता इंटरनेटचे बीलच भरले नसल्याचे उघड झाले आहे. याबरोबरच तेथे असणारे अपुरे व सतत बदलत राहणारे मनुष्यबळ हे भोंगळ कारभारात आणखी भर घालत आहेत.

नव्याने आलेल्या कर्मच्याऱ्याला पोलिस हद्दीची माहिती असेलच असे नाही. त्यामुळे येथे आलेला कॉल नेमका कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून, तो कोणाला ट्रान्सफर करायचा हा नेहमीचाच गोंधळ आता नित्याचा झाला आहे. यात भर म्हणून जनसंपर्क अधिकारी नावापुरता राहिला असून, त्यांच्याकडून जबाबदारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नियंत्रणकक्षाचा १०० क्रमांक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला देण्यात आलेला नाही.

त्यामुळे नागरिकांना तातडीने मदत मिळेल याची काही शास्वती राहिलेली नाही. या सर्व तक्रारींवर योग्य तो तोडगा तत्काळ काढण्याच्या सूचना आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी यापूर्वी वेळोवेळी संबंधित सहाय्यक आयुक्त-उपायुक्तांना दिल्या आहेत. परंतू, त्यांच्याकडे आयुक्तांच्याच आदेशाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सर्व कारभारावरून दिसून येत आहे.

नागरिकांपर्यंत पोलिस पोहचला पाहिजे. नागरिकांनी केवळ हाक द्यावी आम्ही पोहचू असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन अधिकाऱ्यांना तशा सुचना देखील केल्या आहेत. मात्र ज्या नियंत्रण कक्षाद्वारे नागरिक थेट पोलिसांशी संपर्क साधू शकतात त्याच नियंत्रण कक्षाकडे वरीष्ठ दुर्लक्ष करीत आहेत. साधे इंटरनेट बील वेळेवर भरले गेले नाही अशाने नियंत्रणकक्षाची हि परिस्थीती कायम राहिली तर नागरिकांपर्यंत पोलिस पोहचणार कसे असा सवाल आता उपस्थित होत आहे.