श्री अंबाबाई मूर्ती बदलाचा कोणताही विचार नाही : जाधव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अंबाबाई मूर्ती दुखावल्याने काही व्यक्ती अनेक प्रकारचे तर्क करून मूर्ती बदलण्याबाबतचे निवेदन देवस्थान समितीला देत आहेत. मात्र, असा मूर्ती बदलण्याबाबतचा कोणताही निर्णय देवस्थान समितीने अद्याप घेतला नाही किंवा असा कोणताही विचार नाही. देवस्थान समितीच्या बैठकीत याबाबतचा कोणता ठरावही झालेला नाही, असे स्पष्टीकरण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले आहे.

काही संघटनांनी अंबाबाई मूर्ती बदलाबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले होते. त्यानुसार कोल्हापूरात मूर्ती बदलाबाबत विविध प्रकारे चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत जाधव यांनी मूर्ती बदलाबाबत कोणताही निर्णय नसल्याचे म्हटले आहे. जाधव म्हणाले, मूर्ती बदलणे हा खूप मोठा विषय आहे. याबाबतचा निर्णय एकटी देवस्थान समिती घेऊच शकत नाही. सध्या हा विषय समितीच्या विषयपत्रिकेवर नाही. या विषयावर सदस्यांशी चर्चादेखील झालेली नाही किंवा समितीने तसा ठरावही केलेला नाही. त्यामुळे आमच्याकडून मूर्ती बदलाच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. अंबाबाईची मूर्ती हा एकच विषय समितीकडे नाही; तर मंदिर पुरातन असल्याने सध्या काही ठिकाणी दगड निखळले आहेत. अशा वेळी मंदिराचे जतन, संवर्धन झाले पाहिजे.

दरम्यान, अंबाबाई भक्तांच्या मागणीमुळे शासनाने एप्रिल २०१८ मध्ये नवा अंबाबाई मंदिर कायदा केला आहे. या कायद्यानुसार मंदिराचा कारभार नव्या मंदिर व्यवस्थापन समितीकडे आहे. त्यामुळे सध्याच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अंबाबाई मूर्तीबाबत, पुजारी भरतीबाबत किंवा नोकर भरतीबाबत अधिकार नाहीत, असे प्रसिद्धी पत्रक पुजारी हटाव समितीचे दिलीप देसाई यांनी प्रसिद्ध केले आहे.या पत्रकात म्हटले आहे की, मंदिरामध्ये देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कायदा होऊनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे देवीचे उत्पन्न कुठे जाते याचा काही पत्ताच नाही. देवस्थान समिती तर पुजारी भरती, नोकर भरती आणि आता तर मूर्ती बदलण्याची भाषा करत आहे. परंतु सध्याच्या समितीला कोणताच अधिकार नाही. सध्याच्या मुर्तीच्या स्वरूपात बरेच बेकायदेशीर बदल झाले आहेत.