तानाजी सावंतांच्या बाबत कोणतीही चर्चा नाही, मातोश्रीवरील बैठकीनंतर विनायक राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मातोश्रीवर उस्मानाबादच्या शिवसैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली. शिवसैनिकांनी शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार हे सांगण्यात आले होते. परंतु आजच्या बैठकीत तानाजी सावंत यांच्याबद्दल कोणतीही चर्चा न झाल्याचे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी सांगितले.

विनायक राऊत म्हणाले की तानाजी सावंत यांच्याबाबत कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही. ही बैठक संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आली होती. कोणीही बैठकीत तानाजी सावंत यांच्याबाबत तक्रार केली नाही, बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा झाली.

विनायक राऊत म्हणाले की काही संघटनात्मक बदल करायचे आहेत. त्यासाठी ही बैठक झाली आणि त्यावर चर्चा झाली. कोणीही पक्षाविरोधात कारवाया केल्या तर त्याची गय केली जाणार नाही.

शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या मराठवाड्यातील बैठकीला तानाजी सावंत यांच्या अनुपस्थितीमुळे ही नाराजी असल्याचं समजत होते. तानाजी सावंत यांची पक्षातून हाकालपट्टी करावी अशी शिवसैनिकांची मागणी होती.

शिवसैनिकांची मागणी आहे की, तानाजी सावंत यांच्यावर पक्षाविरोधातील कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करावी. त्यांच्या वागण्यामुळे शिवसेनेची प्रथा-परंपरा आणि नियमांचं उल्लंघन झालं आहे असं शिवसैनिक सांगत होतो. आज दुपारी मातोश्रीवर याच संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली.परंतु यात तानाजी सावंत यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विनायक राऊत यांच्याकडून सांगण्यात येत असले तरी तानाजी सावंतांविरोधात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/