केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा ठाकरे सरकारवर ‘हल्लाबोल’, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनोच्या लढ्यात महाराष्ट्रात प्रशासन कोलमडले असून राज्यात नेतृत्वाची कमतरता असल्याचा हल्लाबोल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाकयुद्ध आता पेटले आहे. कोरोनामुळे उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे काही श्रमिक कामगारांनी राज्याची पायी वाट धरली होती. सरकारने त्यांच्यासाठी रेल्वेसेवा सुरू करत त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र सरकारने श्रमिक रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याच्या केलेल्या आरोपाचे गोयल यांनी खंडन केले हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही. याव्यतिरिक्त ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे मुख्य सचिव आणि नोडल अधिकार्‍यांच्या संपर्कात होते. महाराष्ट्राला त्वरित 125 रेल्वेगाड्या पाठवण्याचा निर्णय घेतला असतानाही आम्हाला त्वरित यादी मिळावी यासाठी राज्य सरकारला यादी तयार ठेवण्याचीही विनंती केली. महाराष्ट्राला हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या पुरवण्याची आमची तयारी आहे. परंतु सरकारडे यादी तयार नाही ही वाईट बाब आहे. सध्या हे श्रमिक प्रवासी कुठे आहेत याबाबतही माहिती नाही. रेल्वे प्रशासानाने सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रेल्वेगाड्या हव्या आहेत यासाठी यादी सोपवण्याची विनंती केली. परंतु राज्य सरकारकडून कोणतेही एकत्रित उत्तर मिळाले नाही, असा दावा त्यांनी केला.