पुण्यात कसल्याही प्रकारचं लॉकडाऊन नाही : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- स्थानिक प्रशासनाने देशात कुठेही पुन्हा लॉकडाऊन करु नये, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. मात्र पुण्यात महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने खळबळ उडाली. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कंटेन्मेंट आदेश काढण्यात आले. या आदेशान्वये सिंहगड रोड परिसरात पत्रेही मारण्यात आले. मात्र, ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच हे क्षेत्रीय कार्यालयाकडून काढण्यात आलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. तसेच पुणे शहरात कोठेही लॉकडाऊन करण्यात आलेला नसल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महापालिकेतील वॉर्ड अधिकाऱ्याने सिंहगड रोड परिसरात लॉकडाऊनचा आदेश दिल्याने खळबळ उडाली. मात्र, त्यानंतर थेट महापौरांनी या प्रकरणाची दखल घेत मध्यस्थी करण्याची आयुक्तांना सूचना दिली. तसेच हा लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्यास सांगितले. शहरातील कुठल्याही भागात लॉकडाऊन होणार नाही. याबाबत एका ठिकाणी निर्णय घेण्यात आला होता. तो रद्द करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यात आपण नव्याने लॉकडाऊन करत नाही. दर काही दिवसांनी नव्या कंटेन्मेंटची झोनची निर्मीती करत असतो. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी झाली आहे किंवा जिथे रुग्ण संख्या नाही असे कंटेन्मेंट झोन आपण वगळतो. त्यामुळे नव्याने काही मायक्रो कंटेन्मेंट झोन केलेत. त्या भागात व्यवस्था करायची म्हणून तेथील काही रस्ते, गल्ल्या या ठिकाणी पत्रे लावण, बंदोबस्त लावणं हा एक भाग असतो. मात्र, लॉकडाऊन प्रमाणे कोणतीही परिस्थिती त्या ठिकाणी देखील असणार नाही, असे महापौरांनी सांगितले.