नवी मुंबईत उद्या आंदोलन नाही

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी २५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत हिंसेच्या घटना घडल्या होत्या. ९ आॅगस्टच्या आंदोलनाला पुन्हा गालबोट लागू नये याकरिता शहरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा बंद केला जाणार नसल्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B06XPCHFWB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8692fc80-9ac3-11e8-a58e-afabc1bfb47e’]

२५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत ठिकठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून दोन गटांत उद्भवलेल्या वादातून कोपरखैरणेत एका आंदोलकाचा मृत्यू झाला. आंदोलनात मिसळलेल्या काही हिंदी भाषिक समाजकंटकांकडून हिंसा घडवली जात होती. त्यांच्यामुळेच स्थानिक विरुद्ध मराठा असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. दोन्ही समाजात अनेक वर्षांपासून एकोपा असून तो भविष्यातही टिकून राहावा ही सर्वांची इच्छा आहे. परंतु ९ आॅगस्टला पुन्हा मराठा आरक्षणासाठी शहरात बंद अथवा आंदोलन केल्यास हिंसेची पुनरावृती होऊ शकते. पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता नवी मुंबईला आंदोलनातून वगळल्याची घोषणा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली. एपीएमसी येथील माथाडी भवनमध्ये झालेल्या बैठकीअंती हा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयकांनी गुरुवारी, ९ आॅगस्ट रोजी वांद्रे येथील चेतना महाविद्यालयानजीक असलेल्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देण्याचा निर्णय घेतला आहे. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये असलेल्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.