Bird Flu च्या अनुषंगाने घाबरून जाण्याची गरज नाही, पण नागरिकांनी ही काळजी घ्यावी, जाणून घ्या राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारतातील अनेक राज्यात सध्या बर्ड फ्लू (Bird Flu) आजाराची लागण विविध पक्षांमध्ये झालेली दिसत आहे. केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या प्रदेशात बदकं, कोंबड्या, कावळे स्थलांतरीत पक्षी यात प्रामुख्यानं या आजाराची लागण झालेली दिसून येत आहे.

सध्या हा आजार केवळ पक्षांमध्ये आहे तथापि वन हेल्थ संकल्पनेनुसार आपण आपल्या कार्यक्षेत्रात पशु संवर्धन विभागाशी समन्वय राखून या संदर्भात बर्ड फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करणं अपेक्षित आहे असं आरोग्य सेवा संचालनालयाच्या पुण्यातील कार्याकडून सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर नागरिकांसह सर्वांनीच काय काळजी घ्यावी हेही सांगण्यात आलं आहे.

1) इंफ्लूएंझा सदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण –   बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रात इंफ्लूएंझा सदृश रुग्णांचं सर्वेक्षण अधिक प्रभावीपणे करणं गरजेचं आहे. विशेष करून पोल्ट्री फार्म, कत्तलखाने, अशा ठिकाणी काम करणारे लोक पशुसंवर्धन क्षेत्रातील मनुष्यबळ या जोखमीच्या गटातील इंफ्लूएंझा सदृश रुग्णांचं सर्वेक्षण अधिक सतर्कतेनं होणं गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार संशयित नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) पुणे यांच्याकडे पाठवावेत.

2) दैनंदिन अहवाल –  राज्यस्तरावर स्वाईन फ्लूचा दैनंदिन अहवाल नियमित स्वरूपात संकलित केला जातो. त्यात आपल्याकडील इंफ्लूएंझा सदृश रुग्णांचं सर्वेक्षण विषयक माहिती दैनंदिन स्वरूपात सादर केली जाते. ही माहिती अधिक अचूकपणे यापुढेही पाठवण्यात यावी. पशुसंवर्धन विभागामार्फत बर्ड फ्लू विषयक दैनंदिन अहवाल सुरू करण्यात आला आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सदर दैनंदिन अहवालाची एक प्रत आपल्या स्तरावर प्राप्त होईल यासाठी संबंधितांचा समन्वय ठेवावा.

3) आंतरजातीय समन्वय –  बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य आणि कृषी विभाग यांनी समन्वयानं काम करण्याची निकड आहे. प्राणीजन्य आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता वन हेल्थ या संकल्पनेनुसार समन्वायनं काम करावं. आयडीएसपी नवी दिल्ली यांनी व्हेटरनरी तज्ञाचा समावेश करावा. जे प्राणीजन्य आजार माणसांमध्येही आढळतात अशा आजारांची माहिती एकमेकांना नियमित स्वरूपात द्यावी. यासंदर्भात तातडीनं जिल्हा झूनॉटीक समितीची बैठक घ्यावी. या बैठकीत या संदर्भात जिल्हानिहाय कृती योजना ठरवावी.

काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणू हा स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळला असून हिवाळ्यात आपल्याकडे असे पक्षी येण्याचं प्रमाण वाढतं. उजनी जलाशय (पुणे/सोलापूर), नवेगाव बांध (गोंदिया) अशा अनेक ठिकाणी विशेष दक्षता घ्यायची गरज आहे. या अनुषंगानं राज्य विभाग तसंच जिल्हा पातळीवर पक्षी निरीक्षकाकडील माहिती उपयुक्त ठरू शकते.

4) आरोग्य शिक्षण –  सध्या बर्ड फ्लूच्या अनुषंगानं घाबरून जाण्याची गरज नसली तरी या बाबतीत काय काळजी घ्यावी हे सर्वसामान्य जनतेस आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. खालील सूचनांचा अंतर्भाव आरोग्य शिक्षणामध्ये केला जावा असंही आरोग्य सेवा संचालनालयानं सांगितलं आहे.

1) पक्षी स्रावासोबत संपर्क टाळा.

2) पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खायला दिलं जातं अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरनं धुवा. शिल्लक राहिलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.

3) एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षांना उघड्या हातानं स्पर्श करू नका. जिल्हा तसंच विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा.

4) कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात हे पाणी आणि साबणानं वारंवार धुवा, व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.

5) कच्चे चिकन/चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा.

6) पूर्ण शिजवलेल्या (100 डिग्री सेल्सियस) मांसांचाच खाण्यात वापर करावा.

7) आपल्या गल्लीत अथवा परिसरात तलाव असेल आणि त्या तलावात पक्षी येत असतील तर त्या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग/पशुसंवर्धन विभागास कळवण्यात यावं.

पुढील गोष्टी करणं टाळा –

1) कच्चे चिकन/कच्ची अंडी खाऊ नका.

2) अर्धवट शिजलेले चिकन/पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.

3) आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.

4) पूर्णपणे शिजलेलं आणि कच्चं मांस एकत्र ठेवू नका.

यासोबतच एखाद्या भागात मृत पक्षी आढळून आल्यास काय दक्षता घ्यावी तसंच या मृत पक्षाची विल्हेवाट कशी लावावी, यासंदर्भात सूचना पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयानं सर्वांना देण्यात याव्यात.

वरीलप्रमाणे सर्व उपाययोजना आपल्या कार्यक्षेत्रात अमलात आणाव्यात आणि आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी कार्यालयात सादर करावा असंही आरोग्य सेवा संचालनालयानं सांगितलं आहे.