ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी नाकारलं अशांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शैलैत प्रत्युत्तर दिले. ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी पडळकरांचे नाव न घेता केली आहे. शरद पवार सातारा येथे पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.

शरद पवार म्हणाले, ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अशांना वेळोवेळी लोकांनी उत्तर दिले आहे. अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नाही. असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे खुद्द शरद पवार पडखळकरांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या शैलीत पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत बोलताना म्हणाले होते की, शरद पवार हे राज्याला झालेला कोरोना आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, गोपीचंद पडळकरांना काही महत्त्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त झालं आहे. ‘कशाला बोलायचं’. असे म्हणत शरद पवार यांनी पलटवार केला.