तोडगा नाही, अण्णांचे उपोषण सुरूच

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – जल्संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांसोबत तब्बल चाळीस मिनिटे बंद खोलीत चर्चा केली. परंतु या बैठकीत ठोस तोडगा न निघाल्यामुळे अण्णांचे उपोषण सुरूच राहिले आहे. त्यामुळे उद्या पुन्हा महाजन हे राळेगणसिद्धीत पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासनाचे पत्र घेऊन येणार आहेत.

महाजन यांनी अण्णांशी चर्चा करताना भ्रमणध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अण्णांचा संवाद घडवून आणला. त्यांनी अण्णांच्या सर्व मागण्या मान्य करणारे सुधारित विधेयक आणू, असे आश्वासन दिले आहे. महाजन यांनी अण्णांची मनधरणी करण्यासाठी तब्बल चाळीस मिनिटे त्यांची चर्चा केली. परंतु या चर्चेतून ठोस तोडगा निघू शकला नाही. म्हणून अण्णांनी त्यांचे आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे.

अण्णांशी चर्चा करून बाहेर आल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. अण्णांनी उपोषण करणे आरोग्यास ठीक राहणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अण्णांना उपोषण मागे घेण्यासाठी सांगावे, असे आवाहन महाजन यांनी केले. अण्णा उपोषणावर ठाम राहिल्यामुळे लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींचा विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन देणारे पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाचे लेखी पत्र घेऊन महाजनी उद्या पुन्हा राळेगणसिद्धीत येणार आहे.

अण्णांच्या उपोषणावर तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले आहेत. आंदोलनाची तीव्रता अधिक वाढविण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून गावात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला प्रवेश देणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us