‘ते’ बिल टीम इंडियाला महागात पडणार; रिषभ पंतच्या ‘त्या’ चुकीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करणार

पोलिसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सध्या टीम इंडिया आहे. तेथेही भारतीय चाहता वर्ग मोठा आहे. दरम्यान, मेलबर्नच्या एका रेस्टॉरंटमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी व शुबमन गिल हे जेवण्यासाठी गेले होते आणि त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या भारतीय चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

त्या चाहत्याचे नाव नवलदीप सिंग असं आहे. त्यानं रोहित, रिषभ, नवदीप व शुबमन यांचे ११८.६९ ऑस्ट्रेलियन डॉलर ( ६,६८३ रुपये) इतकं बिल भरल्याचा दावा केला आहे. शिवाय त्यानं बिलाचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भारतीय खेळाडूंना जेव्हा हे समजलं, तेव्हा रोहितनं त्याला पैसे घेण्याची विनंती केली. असाही दावा नवलदीपनं केला. पण, यावेळी नवलदीपनं केलेल्या दाव्यातून रिषभ पंतची एक चूक सर्वांसमोर आली आणि त्यानं तो अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस अजून आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे खेळाडूंना अजूनही बायो-बबलचे नियम पाळावे लागत आले. त्यात भारतीय खेळाडू मेलबर्नच्या रेस्टॉ़रंटमध्ये जेवणासाठी गेले. त्यावेळी चाहत्यानं बिल भरल्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत फोटोही काढले. रिषभनं त्या चाहत्याला मिठी मारली, असा दावा नवलदीपनं केला. त्यामुळे त्याच्याकडून बायो बबल नियमांचे उल्लंघन झाले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. डेली टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार, रिषभ पंतनं खरंच त्या चाहत्याला मिठी मारली का, याचा तपास क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार आहे. कोरोना संकटात रिषभच्या या कृतीनं टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. BCCIनेही या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचं वृत्त दी एजनं दिलं आहे. या खेळाडूंनी नियम मोडल्याची शक्यता अधिक आहे.