शाळांच्या येत्या शैक्षणिक वर्षाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या कोरोना व्हायरसचे संकट असून यात सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. सर्व शिक्षण संस्था देखील बंद आहेत. आता शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी कोरोनाबाबत राज्यातील सर्व शिक्षण संस्थांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही फी मध्ये वाढ करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे बऱ्याच पालकांना या सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

तसेच शिक्षण विभागाने आदेशात म्हटले की, पालकांच्या सोयीसाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मधील फी एकाच वेळी न घेता टप्प्या-टप्प्याने जमा करण्याचा पर्याय शाळांनी उपलब्ध करून द्यावा. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत पालकांना ऑनलाइन शुल्क भरण्याचा पर्याय द्यावा. सर्व शिक्षण मंडळाच्या, सर्व माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळा ते कनिष्ठ महाविद्यालयांना हा आदेश लागू असणार आहे.
या आदेशात नमूद केले आहे की, येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही किंवा त्यावर कमी खर्च होणार असेल तर पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करून योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे.

तसेच लॉकडाऊनमध्येही काही शिक्षण संस्था व शाळा पालकांना फी भरण्यास सांगत असल्यामुळे शासनाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पालकांना शाळेचे चालू वर्षाचे आणि येत्या वर्षाचे शुल्क भरण्यास शाळेच्या व्यवस्थापनांनी सक्ती न करता लॉकडाऊन संपल्यावरच शुल्क जमा करून घ्यावे, अशी सूचना विभागाकडून देण्यात आली आहे.

“येत्या शैक्षणिक वर्षात कोणतीही शुल्क वाढ करून नये, हा निर्णय सर्व बोर्डांच्या शाळांना लागू आहे. काही शाळांनी यापूर्वीच वाढीव शुल्क आकारले असेल आणि त्याप्रमाणे पालकांकडून टप्प्याने शुल्क घेतले असले, तर शाळांनी ते वाढीव शुल्क पुढील टप्प्यातील रक्कमेत जमा करावे किंवा वाढीव शुल्क पालकांना परत करावे.” – विशाल सोळंकी, राज्य शिक्षण आयुक्त