…म्हणून मी भाजपात प्रवेश केला, मनसेच्या नगरसेवकानं सांगितलं कारण

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते नगरसेवक मंदार हळबे यांनी मंगळवारी (दि. 2) भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यी उपस्थितीत मंदार हळबे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केला. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचे हळबे यांनी यावेळी सांगितले. हळबे यांच्या भाजप प्रवेशामुळे मनसेला कल्याण डोंबिवलीत मोठे खिंडार पडल्याची चर्चा सुरु आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर मंदार हळबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मी लहानपणापासून भाजपासाठी काम केले आहे. तसेच मला राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. तसेच 10 वर्षे ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरे अयोध्येत जात असल्याने त्याचा आम्हाला आनंद आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील भाजपा ठाकरे यांचे नक्कीच स्वागत करेल, असेही हळबे यांनी सांगितले.

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोमवारी (दि. 1) मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर हळबे यांनी भाजपात प्रवेश केल्याने मनसेला धक्का बसला आहे. कारण कल्याण-डोंबिवलीत मनसेचा विस्तार आणि जनाधार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती.