पाणीबाणी : पाणी काढताना ६ महिला पडल्या विहरीत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सर्वत्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देखील भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशातच विहरीचे पाणी आणण्याकरिता गेलेल्या ६ महिला विहरीत पडल्या. मात्र या सहा महिलांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढले असून या महिलांची प्रकृती आता ठीक आहे.

याबाबत मिळालेली अधिकमाहिती अशी की, फुलंब्री तालुकयातील पानवाडी गावात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या काठावर उभे राहून पाणी शेंदून काढता येत नाही. बादली, हंडा काठावर आदळून कमी पाणी वर येते म्हणून विहिरीवर एका कोपऱ्यात लाकूड टाकून त्यावर उभे राहून महिला, नागरिक पाणी शेंदत होते. एकाचवेळी जास्त महिला पाणी शेंदण्यासाठी उभा राहिल्यामुळे लाकूड मोडले. त्यामुळे उभ्या असलेल्या सर्व सहा महिला विहिरीत पडल्या.

त्या तरुणाचे सर्वत्र कौतुक
महिला विहित पडल्यानंतर जवळच असलेल्या एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन महिलांचा जीव वाचविला. प्रत्येकीला पकडून कडेला आणले आणि त्यांना कडी पकडायला लावली. वेळीच उड्या मारून सर्व महिलांचा जीव वाचविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. उपचारासाठी सर्व महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलांची प्रकृती ठीक असल्याचे फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे.