नगरमध्ये दोन गट भिडले : वाहने जाळली 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – देवानंद शहरातील वंजारगल्‍ली आज दुपारी दोन गट समोरासमोर येऊन तुफान हाणामारी झाली. यावेळी काही दुचाकी वाहने जाळून टाकण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीमुळे व्यावसायिकांनी दुकाने बंद करून पळ काढला.

दोन गटातील वादाचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वंजारगल्‍लीत दोन गटांमध्ये वाद सुरू झाले. त्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. लाकडी दांडके, लोखंडी गजाने एकमेकांना मारहाण करण्यात आली तसेच जोरदार दगडफेक झाली. तसेच जमावातील काही दुचाकींवर पेट्रोल ओतून आग लावली. आगीचा भडका उडाला. त्यामुळे आणखीनच घबराट पसरली. भरदिवसा हा दंगा होताच व्यवसायिकांनी दुकाने बंद करून तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासह त्यांचा फौजफाटा तात्काळ वंजारगल्‍ली दाखल झाला. पोलीस येतातच जमाव पांगला. अग्निशमन दलाची गाडी पाचारण केली. गाडी पोहोचण्यापूर्वीच दुचाकी विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वेळातच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वादाचे कारण मात्र समजू शकले नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने धाव घेतल्‍यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. हा वाद नेमका कशामुळे झाला याची चौकशी सुरू आहे.