पंतप्रधान पदावरून महाआघाडीत वाद होतील : खासदार दानवे यांचा दावा

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. त्यांच्या नेतृत्वावर भाजप ठाम आहे. मात्र, महाआघाडीत पंतप्रधान पदावरून वाद होतील, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज (दि. 4) केला.

दानवे हे आज सायंकाळी नगर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीची भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील. महाआघाडीत अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत. त्या महाआघाडीचा भाजप लोकसभा निवडणुकीत पराभव करेल. आज जरी महाआघाडी होणार असल्याची चर्चा असली, तरी पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून त्यांच्यात भांडणे होतील. भाजपाचा मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. तशी परिस्थिती काँग्रेस व इतर पक्षात कोणत्याही एका व्यक्तीबद्दल नाही.

नगरचा उमेदवार निश्चित नाही

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून कोण उमेदवारी करणार, हे अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. सध्या मतदार संघात पक्षाचे विद्यमान खासदार असले, तरी राज्यात कोठेही उमेदवार निश्‍चित केलेला नाही. पक्षाची संसदीय कार्य समिती सर्व घटकांचा विचार करून लोकसभा निवडणुकीपूर्वी उमेदवार निश्‍चित करेल, असे खा. दानवे यांनी सांगितले.

भाजप-राष्ट्रवादी युती पक्षाला मान्य

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर दोन्ही पदांवर विजय मिळविलेला आहे. भाजप-राष्ट्रवादी व बसपाची ही युती पक्षाला मान्य आहे. पक्षाच्या नेत्यांना विचारूनच, अशा प्रकारची आघाडी स्थानिक पातळीवर चर्चा करून करण्यात आली होती. त्यामुळे कोणा विरोधात कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले.

..तर राष्ट्रवादी बसपाच्या नगरसेवकांना पक्षात घेऊ

बसपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना त्यांच्या पक्षाने काढून टाकले, तर त्यांना आमच्या पक्षात घेण्याची पक्ष नेतृत्वाची तयारी आहे. राष्ट्रवादी व बसपाच्या सर्व नगरसेवकांना पक्ष सामावून घेईल, असा दावाही त्यांनी केला.