… तर तुमचा विम्याचा हप्ता ‘या’ कारणांमुळे वाढणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोना रुग्णावर उपचार किंवा मृत्यू यासंदर्भात विमा दाव्यांची संख्याही सहाजिकच वाढत आहे. यामुळे आयुर्विमा व सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. म्हणून आगामी काळात विमा महागणार असल्याचे विमा व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आयुर्विमा हा सामान्यत: काढला जाणारा विमा. याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही पाहिले जाते. याच्या पारंपरिक पॉलिसींवर मिळणारा बोनस हा दिवसेंदिवस कमी होत गेला आहे. तसेच यातील एन्डोव्हमेंट पॉलिसींवरील परतावा देखील कमी झाला आहे. आयुर्विमा कंपन्यांचे खर्च वाढल्यामुळे सहाजिकच पॉलिसीधारकांना तितकासा फायदा आता मिळत नाही. त्यामुळे पारंपारिक पॉलिसी खरेदी करण्याकडे कल कमी होईल, असा विमा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

टर्म विम्यासाठी अधिक पैसे

आगामी काळात टर्म विमा महागणार आहे. पारंपारिक एन्डोव्हमेंट पॉलिसींमधून मिळणारे लाभ कमी होणे आणि सर्वात स्वस्त असल्याने कमी उत्पन्न असलेल्यांनाही परवडणे यामुळे टर्म विमा लोकप्रिय होत चालला आहे. परंतु आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पुनर्विमा करणाऱ्या कंपन्यांनी पुनर्विम्याचे दर वाढवल्यामुळे टर्म विमा आगामी काळात महाग होणार आहे. यामध्ये 10 ते 15 टक्के वाढ होईल, असे विमा उद्योगाचे म्हणणे आहे. मात्र, सध्या ज्यांनी टर्म विमा घेतला आहे त्यांच्या प्रिमियममध्ये वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

आरोग्य विमा महागणार

आरोग्य विम्याचे कॉन्ट्रॅक्ट एका वर्षाचे असते. दरवर्षी या पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते. कोरोना काळात आरोग्यविमा दाव्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हे दावे कोरोनामुळे होणारे मृत्यू तसेच कोरोनामुळे केल्या जाणाऱ्या उपचारांच्या खर्चासंबंधी आहेत. परिणामी, आरोग्यविमा कंपन्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे यामध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विमा महागण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आरोग्यविमा महागण्याची कारणे

–  चलनवाढ आणि विमा नियामकाचे बदलेले नियम

–  अपेक्षेपेक्षा दाव्यांची वाढती संख्या व त्यामुळे विमा कंपन्यांवर येत असलेला आर्थिक ताण

–  रुग्णालयातील उपचारांचा वाढता खर्च

वित्त नियोजक अमोल परांजपे यांनी सांगितले की, एन्डोव्हमेंट प्रकारातील पारंपारिक पॉलिसींची जादू आता ओसरली आहे. एन्डोव्हमेंट, मनीबॅक या पॉलिसींमध्ये गुंतवलेल्या रकमेवर मिळणारा परतावा पूर्वी 12 टक्के होता. आता हे प्रमाण 5 ते 5.5 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. यामुळे या पॉलिसींचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होईल.