प्रजासत्ताक दिनी पश्चिम बंगालचा ‘चित्ररथ’ नसणार, राजकारण तापण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पश्चिम बंगालमधील विकास कार्य, जल संरक्षण, पर्यावरण संरक्षण या कल्पनेवरील चित्ररथाची प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनासाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

येत्या काही महिन्यात पश्चिम बंगालच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांना धक्का देऊन भाजपाचे सरकार बनविण्याचा मोदी शहा यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे त्यांच्या प्रत्येक कृतीचा ममता बनर्जी जोरदार प्रतिकार करीत आहेत. केंद्र सरकारच्या सीएए च्या विरोधात सर्वाधिक विरोध पश्चिम बंगाल सरकार करत आहे. ममता बनर्जी यांनी बंगालमध्ये सीएए लागू करणार नसल्याची घोषणा केली आहे.

येत्या २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात पश्चिम बंगालने राज्यातील विकास कार्य, जलसरंक्षण, पर्यावरण संरक्षण अशा कल्पनेवर चित्ररथ तयार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याचबरोबर एकूण ५६ प्रस्ताव प्रस्ताव आले होते. एक्सपर्ट कमिटीने त्यापैकी १६ राज्ये आणि ६ मंत्रालयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यात पश्चिम बंगालच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला नाही.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा विकास कामांची झलक दाखविण्याचा प्रयत्न चित्ररथाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होता. तर पश्चिम बंगाल सरकारच्या विकास कामांचा या चित्ररथाद्वारे देशभर प्रसिद्धी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम बंगालचा प्रस्तावच नामंजूर करण्यात आला असल्याचे म्हणणे आहे. यावरुन आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/