वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यात लॉकडाऊन होणार? महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना दिला ‘हा’ इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरांमध्ये सतत कडक निर्बंध लागू केले जात आहेत. अशातच पुण्यात देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्याचा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन आणि नागरिक सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. याशिवाय ऑक्सिजन बेडची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. महापौर म्हणाले, सुदैवाने शहरामध्ये 23 हजार सक्रिय रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण होमक्वारंटाइनमध्ये आहेत. त्यामुळे ही बाब दिलासायक आहे.

लॉकडाऊन करणार नाही

पुणे शहरामध्ये दररोज 15 हजार चाचण्या आणि 20 हजार लसीकरण करुन कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी प्रशासन तयार असल्याचे महापौर यांनी सांगितले. तसेच शहरात रुग्णांची संख्या वाढत असली तरी उपाययोजना वाढवण्यात येत आहे. मात्र, रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन केले नाही तरी निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार असल्याचे महापौरांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी (दि.21) पुण्यात 2900 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 20 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी दिवसभरात 1245 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात 22 हजार 524 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 519 रुग्ण व्हेंटीलेटर तर 955 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 2 लाख 35 हजार 394 रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 लाख 7 हजार 817 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.