राज्यात लवकरच ‘स्थिर’ सरकार, दिल्लीत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनीटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल असा दावा केला.

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत काय चाललंय यावर मी कसं बोलणार ? राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी आमचे सर्वांचे एकमत असून राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना राऊत म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थीतीमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करण्याबाबत शरद पवार यांच्या सोबत चर्चा केल्याचे सांगितले.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली नाही यावर बोलताना राऊत म्हणले, या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली नसेल तर मी कसं त्यांना विचारू ? मात्र, लवकरच शिवसेनेच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन होईल असा विश्वास देखील संजय राऊत यावेळी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधून, आमच्यामध्ये कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याचे सांगत शिवसेनेला पुन्हा गॅसवर ठेवले आहे.

Visit : Policenama.com