….म्हणून भाजपाने अडीच वर्षे ‘मुख्यमंत्री’पद शिवसेनेला देण्यास दिला ‘नकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समसमान पद्धतीने वाटून घेण्याचे ठरले असतानाही भाजपाने ते वचन मोडले इतकेच नव्हे तर मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी टोकाचा निर्णय घेऊन काँग्रेस -राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. कदाचित मी पाच वर्षासाठी मुख्यमंत्री व्हावे अशीच भाजपा नेत्यांची व त्यांच्या दिल्लीतील नेतृत्वाची इच्छा असेल म्हणून त्यांनी अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास नकार दिला, अशा उपरोधिक शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबतचे गुपित सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात ही बाब सांगितली. यात त्यांनी भाजपाबरोबरच महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांमधील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले.
आपल्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. याचे खूप वाईट वाटले. ते सहन करणे शक्यच नव्हते. त्यातूनच हा वेगळा निर्णय घेतल्याचे सांगत. आपण इतका टोकाचा निर्णय घेणार नाही असे त्यांना वाटले असेल तर त्यांनी आपल्याला ओळखलेच नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

कदाचित त्यांचे ते विधानच घटनाबाह्य होते की नाही ते माहिती नाही अशी कोपरखळी मारत उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणतेही सरकार हे घटनाबाह्य काम करुच शकत नाही़. ते घटनेच्या चौकटीतच अस्तित्वात येते. मी मुख्यमंत्रीपदाची शपथही घटनेला धरुनच घेतली. अशा शब्दात त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावरुन सुरु झालेल्या वादावर भाष्य केले.

सध्या मी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत आहे. त्यामुळे पूर्वीसारखा शिवसैनिकांना भेटायला वेळ देता येत नाही. पण आता एक दिवस शिवसेनेसाठी देणार आहे. मातोश्रीची दारे शिवसैनिकांसाठी सदैव उघडी आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –