थेऊर ग्रामपंचायतीमधील सर्व खुर्च्या रिकाम्याच, महामारीच्या काळात नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – येथील ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली तर ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांची बदली झाली. या सर्व घटनेमुळे येथील ग्रामपंचायतीमधील सर्व खुर्च्या रिकाम्याच असल्याने कोरोना महामारीच्या काळात नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार हा प्रश्न ग्रामस्थांना सतावतो आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्यावर शासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त झाले.

हवेलीतील अशा 47 ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने याची जबाबदारी केवळ नऊ विस्तार अधिकार्‍यावर येऊन पोहोचली. लोणी काळभोर उरुळी कांचन यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावासह थेऊर कुंजीरवाडी सोरतापवाडी अशा मध्यम लोकवस्तीच्या पाच गावची जबाबदारी एकाच विस्तार अधिकार्‍यावर आली आहे. थेऊर येथील ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांची बदली झाल्याने सध्या या ठिकाणी क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कळले असले तरीही ते आणखी येथे पोहोचले नाहीत त्यामुळे येथील पदाधिकार्‍यासह अधिकारी यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत.

थेऊरमध्ये वेगवेगळ्या भागात नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे अशावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे सध्या केवळ आरोग्य विभागावर सर्व भिस्त येऊन पडली आहे गावातील नागरीक मात्र बिनधास्त आहेत त्यामुळे रुग्णाची संख्या वाढत आहे.महत्त्वाचे म्हणजे लक्षणे लपवून ठेवल्याने परिस्थिती अवघड होते याचा परिणाम आजपर्यंत या गावातील पाच जण या आजाराने दगावले आहेत.